बुलडाणा (वृत्तसंस्था) खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील एका एका वैफल्यग्रस्त तरुणाने स्वतःचेच सरण रचून आत्मघात केल्याची घटना घडली आहे. लग्न जुळत नसल्याच्या निराशेतूनच युवकाने आत्महत्या केल्याचा दावा पोलीस सुत्रांकडून केला जात आहे
खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (वय २७) हा युवक गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने निराश होता. गुरूवारी पहाटे त्याने स्वतःच्या शेतात सरण रचून डिझेलच्या सहाय्याने पेटवून घेतले. गंभीररित्या भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
याप्रकरणी पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत. निराशेतूनच युवकाने आत्महत्या केल्याचा दावा पोलीस सुत्रांकडून केला जात आहे. यासंदर्भात बोलताना पळशी खुर्दचे पोलीस पाटील गजानन पाटील म्हणाले, पेट्रोल अंगावर घेऊन युवकाने पेटवून घेतले. त्याने सरण रचले नाही. आगीच्या ज्वाळांमुळे शेतातील पन्हऱ्हाटीची गंजी पेटली. जास्त भाजल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, महेंद्रने इतक्या धक्कादायक पद्धतीने आपली जीवन यात्रा का संपवली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या तरुणाचे लग्न जुळत नसल्याने त्याने निराशेपोटी आत्महत्या केली, अशी चर्चा गावात आहे.
















