मुंबई (वृत्तसंस्था) कारवाई करण्याच्या नावाखील अंगडीयाचा व्यापार करणाऱ्यांना आयकर विभागाची भीती दाखवून पोलिसांनी पैसे उकळल्याचा प्रकार मुंबई पोलीस दलातील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (Police Inspector), सहायक पोलीस निरीक्षक (API), पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांच्यावर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात आज गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्यासह इतरांवर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 चे अधिनियमांतर्गत कलम 392, 384, 341,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग मुंबई दिलीप रघुनाथ सावंत Addi CP, South Regional Division Mumbai Dilip Raghunath Sawant (वय-57) यांनी फिर्याद दिली आहे.
अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग दिलीप सावंत यांच्या अंतर्गत 18 पोलीस स्टेशन येतात. 7 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील भुलेश्वर येथील अंगडीया असोसिएशनचे योगेशभाई गांधी, जतीन शहा, मधुसूदन रावल, मनगनभाई प्रजापती यांनी दिलीप सावंत यांची भेट घेऊन लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अमंलदार यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यामध्ये त्यांनी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी पोफळवाडी परिसरात ज्यांच्या बॅगेत पैसे असतील त्यांना मुंबादेवी पोलीस चौकीत नेऊन पैसे उकळल्याची तक्रार दिली होती. तसेच यामध्ये पोलीस निरीक्षक बंगाटे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिलीप सावंत यांनी पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांच्या मार्फत पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडे टिपणी सादर केली. यावर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पैसे घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच लो. टि. मार्ग पोलीस ठाण्यातील प्रवेशद्वार व ठाणे अंमलदार कक्षातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. प्राथमिक तपासात पोलीस निरीक्षक ओम बंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे व इतर अंमलदार यांनी 2,3,4 व 6 डिसेंबर 2021 रोजी पोफळवाडी परिसरातील अंगडीया व्यापार करणाऱ्यांना आयकर विभागाची भीती दाखवून पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलिसांची वागणूक आणि पोलीस ठाण्यातील नोंदी यामध्ये तफावत आढळून आली. तसेच पोलीस निरीक्षक वंगाटे यांच्या आदेशानुसार कारवाई केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक कदम आणि पोलीस उपनिरीक्षक जमदाडे यांनी त्यांच्या जबाबात सांगितले.