(चोपडा प्रतिनिधी ) : उद्विग्नतेने महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला खरा; पण दोनशे ते सव्वा दोनशे फूट उंचीवरून पडूनही पाणी ३ ते ४ फूट असल्याने त्या बचावल्या आहेत. स्थानिक तरुणांनी तिला वाचवले असून त्यांच्या पायाला मात्र दुखापत झाली आहे.
तापी नदीच्या पुलावरून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील रहिवासी एका विवाहितेने नदीच्या पाण्यात उडी – मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
दोन चिमुकल्यांना नातेवाइकांकडे सोडून आत्महत्येचा प्रयत्न
दोनशे ते सव्वा दोनशे फूट उंचावरून उडी मारल्याने महिलेचा डावा पाय फॅक्चर झाल्याचेही राजेंद्र भाटिया यांनी सांगितले. जीवनाला कंटाळून या महिलेने आपली दोन्ही चिमुकले मुले नातेवाइकांकडे वेले येथे सोडून आत्महत्येचा प्रयत्न केला.
मात्र, तीन-चार फूट पाण्यात उडी मारल्याने त्या बचावल्या. त्यांनी उडी मारल्याचे पाहून नदीपात्रात असलेल्या निमगव्हाण येथील एकनाथ भील, कैलास भील आणि तांदलवाडी येथील लहान्या भील यांनी निमगव्हाण येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र भाटिया यांना माहिती दिली.
भाटिया यांनी सांगितल्यानुसार एकनाथ भिल व लहान्या भील यांनी महिलेला पाण्याच्या बाहेर काढले. तात्काळ राजेंद्र भाटिया यांनी कमलेश बाविस्कर यांच्याशी संपर्क करून रुग्णवाहिकेसह नदीपात्रात हजर झाले. महिलेला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावर तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आणि डॉ. चंद्रहास पाटील यांनी उपचार सुरू केले.
या महिलेला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेल्याचे भाटिया यांनी सांगितले.