पाचोरा (प्रतिनिधी) पाचोऱ्यात वाहनांमध्ये घरगुती गॅस भरण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका ठिकाणाहून १७ गॅस सिलेंडर, गॅस पंप, आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. यासंदर्भात एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जारगाव चौफुलीवर एका दुकानात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर अनधिकृतपणे वाहनांमध्ये इंधन म्हणून केला जात होता. हा प्रकार एका बंद दुकानात गुप्तपणे सुरू होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर छापा टाकण्यात आला. पोलिसांना घटनास्थळी १७ गॅस सिलेंडरसह गॅस भरण्याचे मशीन तसेच एक हॉर्सपॉवरची इलेक्ट्रिक मोटार गॅस भरण्याची मशीन स्प्रेयर मशीन तसेच इतर साहित्य असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.
या प्रकरणात पोलिसांनी एका नोकराला अटक केली असून, दुकानमालक फरार आहे. पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील करीत आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने जनतेला अशा प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.