जळगाव (प्रतिनिधी) पोलीस मुख्यालयात नियुक्ती असलेले अधिकारी किंवा कर्मचारी सकाळच्या हजेरीनंतर विना परवानगी गायब होत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या तक्रारींची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली. त्यामुळे मुख्यालयात नियुक्तीस असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेसची हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. याबाबतच्या आदेशाचे पत्र पोलिस मुख्यालयाच्या राखीव पोलिस निरीक्षकांनी संबंधितांना दिले आहे. त्यामुळे आता सकाळच्या हजेरीनंतर गायब होण्याच्या प्रकाराला चाप बसणार आहे.
पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी ड्युटीपासून मुक्तता मिळावी. यासाठी वर्षानुवर्षे पोलीस मुख्यालयात नियुक्ती करुन घेत असतात. पोलिस मुख्यालयात कार्यरत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बंदोबस्त व इतर ठिकाणी कर्तव्यावर पाठविले जाते. याठिकाणी नियुक्ती असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सकाळी हजेरी लावल्यानंतर ज्यांना कर्तव्यावर पाठविले जाते. तसेच त्यांच्याव्यतिरिक्त इतर जण नियंत्रण कक्षात थांबत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. तसेच बहुतांश कर्मचारी हे सकाळी हजेरी झाल्यानंतर काही वेळ थांबून लागलीच निघून जात होते. तेच पुन्हा दुसऱ्याच दिवशी हजेरीसाठी येत असल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. यातून अनेक वेळा अधिकारी, कर्मचारी हजर नसल्यास तारांबळ होते. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिस मुख्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन वेळची हजेरी सक्तीची करण्यात आली आहे.
जे पोलिस अधिकारी, कर्मचारी पोलिस मुख्यालय सोडून आपले खासगी कामे करीत असल्याचे देखील अनेक प्रकार उडकीस आले आहे. ड्युटीच्या वेळी इतरत्र येणे-जाणे करतात त्यांना याविषयी वरिष्टांना लेखी अर्ज देऊन परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना मुख्यालय सोडावे असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित अधिकारी, हजेरी मेजर यांनी दोन्ही वेळच्या हजेरीचा लेखी अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. जे पोलिस अधिकारी, कर्मचारी रोल कॉलवर हजर राहणार नाही त्यांचा कसुरी अहवाल वरिष्टांना पाठविण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.