जळगाव (प्रतिनिधी) ही बँक आहे का..? विचारातच एका व्यावसायिकाची शुद्ध हरपली अन् त्यांचे ११ लाख लांबवले गेल्याची घटना घडली. ट्रान्सपोर्टनगरातील बँकेजवळून गायब झाल्यानंतर व्यापारी बेशुद्ध अवस्थेत कुऱ्हा-पानाचे शिवारात आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर तुकाराम पाटील (वय ५२, रा.अयोध्यानगर) असे व्यावसायिकाचे नाव आहे.
ज्ञानेश्वर पाटील हे पत्नीसह अयोध्यानगरात किराणाचा व्यवसाय करतात, किराणासह दूध विक्रीचीही एजन्सी त्यांनी घेतली आहे. दूध विक्रीच्या एजन्सीचे पैसे देण्यासाठी ते मंगळवारी बोदवड येथे जात होते. त्यांनी शहरातील ट्रान्सपोर्टनगरातील एका बँकेतून मंगळवारी दुपारी १ वाजता, ११ लाखांची रक्कम काढली. बँकेतून पैसे काढल्यानंतर बँकेच्या आवारातच एका व्यक्तीने ही बँक आहे का..? असे विचारले. त्यावर त्यांनीही बँक असल्याची माहिती दिली; मात्र त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांची शुद्धच हरपली. ज्ञानेश्वर पाटील हे रात्रीपर्यंत घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोध सुरु केला. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. अखेर एमआयडीसी मिसींगची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून तपास सुरू झाल्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांची दुचाकी ट्रान्सपोर्टनगरातील बँकेजवळ आढळून आली. तर मोबाईल जामनेर येथे एका व्यक्तीला रस्त्यावर पडलेला आढळला; मात्र रात्री उशिरापर्यंत ज्ञानेश्वर पाटील यांचा पत्ता लागलाच नव्हता.
बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा-पानाचे या गावातील एका शेतालगतच्या नाल्याच्या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील आढळून आल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. गावातील एका शेतकऱ्याला दिसून आले, त्यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांचे हात-पाय बांधलेले होते. त्या शेतकऱ्यानेच ज्ञानेश्वर पाटील यांना शेतातून बाहेर आणले. दरम्यान, ज्ञानेश्वर पाटील हे त्याठिकाणी कसे पोहोचले..? याबाबतची माहिती पाटील यांनाही सांगता येत नव्हती. नातेवाईकांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्याठिकाणाहून ज्ञानेश्वर पाटील यांना घरी आणले. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांनी बँकेतून काढलेली ११ लाख २० हजार रुपयांची रक्कम अज्ञातांनी लांबविल्याचेही स्पष्ट झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.