नाशिक (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर याचा मुलगा सूरज झंवरला एका अनोळखी व्यक्तीने पालकमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ आणि जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नावाने फोन केल्याची घटना पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नावाचा वापर करीत बीएचआर पतसंस्थेच्या प्रकरणात अटकेत असलेले सुनील झंवर यांच्या मुलाला फोन करून मदतीसाठी आश्वासन देत त्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनिल झंवर यांचा मुलगा सूरज झंवर पालकमंत्री छगन भुजबळ, पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करण्यात आला. तसेच, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नावाने देखील आपणांस मदतीसाठी फोन आल्याचे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या प्रकरणात जळगाव येथील उद्योजक तथा नाशिकचे माजी पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारा सुनिल झंवर याच्यावर पुण्यातील डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
पंकज भुजबळ बोलतोयचा फोन
बीएचआर प्रकरणात सुनिल झंवर यांना ७ सप्टेंबर रोजी नाशकातूनच अटक करण्यात आली होती. त्याचा मुलगा सूरज झंवर या प्रकरणात गुंतलेला असून तो उच्च न्यायालयात कामानिमित्त गेला असतांना त्यास ९४२३४२१११ क्रमांकावरुन फोन आला. मी पंकज भुजबळ बोलत असून ८ सप्टेंबर २०२१ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मला येऊन भेटा, असे सांगत फोन बंद करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन फोन करुन मी भुजबळांचा पीए बोलत असल्याचे सांगून तुम्ही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले नाही. कलेक्टर साहेबांचा पीए वाट पाहत असल्याचे सांगितले.
अभिजित राऊत बोलत असल्याचाही फोन
पंकज भुजबळ यांचे नाव फोन झाल्यानंतर काही वेळातच जळगाव येथील एका लॅण्डलाइन क्रमांकावरुन ‘मी अभिजित राऊत (जळगाव कलेक्टर) बोलतोय…तुमचे काही काम आहे का? अशी विचारणा केली गेली. मी नाही म्हटल्यावर त्यांनी फोन ठेवला. या प्रकारानंतर सूरज झंवर यांनी जिल्हाधिकारी राऊत यांची भेट घेतली. त्यांनाही या प्रकारासंदर्भात काहीच माहिती नव्हती. त्याचवेळी नाशिकवरुन पंकज भुजबळ यांचा फोन आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या पीएने सांगितले. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या मोबाइल क्रमांकावरून पंकज भुजबळ बोलत असल्याचा फोन आला. त्यांनी लॅण्डलाइनवरून फोन करण्यास सांगितले.
समीर आणि पंकजच्या संपर्कात रहा, ते मदत करतील
सूरज झंवरने जळगाव येथील मित्राच्या लॅण्डलाइनवरुन फोन लावला असता, स्वतः छगन भुजबळ बोलत असल्याचे बतावणी करीत माझा फोन आल्याचे कोणाला सांगणार नसल्याचे वचन मागितले. त्याचवेळी माझे एक काम करुन द्या, मी तुमचे मोठे काम करुन देतो, अशी चक्क ऑफरच भुजबळांनी दिल्याचे म्हटले आहे. तुम्हाला समीर व पंकज हे दोघे मदत करतील, तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा असे म्हणत फोन बंद करण्यात आला. असेही झंवर यांनी पोलिसांना सांगितले.
चौकशी करुन गुन्हा दाखल
मोबाईलवर आलेले ऑडिओ क्लिपिंग पालकमंत्री भुजबळ, समीर भुजबळ यांना ऐकवल्या. या दोघांच्या व जिल्हाधिकारी राऊत यांच्याही आवाजाशी फोन करणाऱ्या व्यक्तीचा आवाज जुळत नसल्याचे लक्षात आले. त्यावरून नाशिक पोलिसांत १८ सप्टेंबर रोजी दाखल अर्जावर चौकशी करून पालकमंत्र्यांसह पंकज भुजबळ व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
















