मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात सदर तरुणीने तक्रार दिल्याची माहिती देखील समोर आली असून, तिच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नसल्याचे देखील तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सदर महिलेने आरोप करत म्हटले आहे की, २००६ पासून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याच्यार करण्यात आला आहे. जर तुला गायिका बनायचे असले तर, तर मी बॉलीवूड मधील मोठ्या निर्मात्यांशी भेटून तुला लॉंच करीन असे आमिष देखील दाखवण्यात आल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतीची साद घातली आहे.