जालना (वृत्तसंस्था) विधवा सुनेचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्यामुळे दोघांची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना चपळगावात घडलीय. या प्रकरणी महिलेचे सासरे आणि दिराला अटक केली असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारिया लालझरे आणि हरबक भागवत अशी मृतांची नावे आहेत. तर दोघांची हत्या करणाऱ्या बथवेल लालझरे आणि विकास लालझरे यांना चपळगाव पोलिसांनी अटक केली आहे. बथवेल लालझरे हे मारियाचे सासरे असून विकास हा तिचा दिर आहे. मारियाच्या (वय ३२ वर्षे) पतीचं १० वर्षांपूर्वी निधन झालं. यानंतर मारियाचे गावातल्याच हरबक भागवतसोबत (वय २७ वर्षे) प्रेमसंबंध होते. भागवत विवाहित होता. मात्र, मारिया आणि हरबकच्या प्रेम संबंधाला तिच्या सासरच्या मंडळींचा विरोध होता. मारियापासून दूर राहा, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी त्यांनी हरबकला दिली होती. त्यानंतर हरबकनं अंबड पोलीस ठाण्यात मारियाचे सासरे आणि दिराविरोधात तक्रार दाखल केली. आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यानं तक्रारीत म्हटलं होतं. ३० मार्चला हरबक आणि मारिया गुजरातला पळून गेले. त्यानंतर मारियाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
२२ एप्रिलला पोलिसांनी दोघांना गुजरातमधून परत आणलं. त्यानंतर ते गावात एकत्र राहू लागले. २८ ऑक्टोबरला मारिया आणि हरबक दुचाकीवरून शेजारच्या गावाला जात होते. त्यावेळी ट्रॅक्टरने येत असलेल्या विकास लालझरेने त्यांना धडक दिल्याचा आरोप आहे. विकासने त्यांना ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेत असतानाच दोघांचा मृत्यू झाला. विकास लालझरे आणि त्याच्या वडिलांनीच माझ्या पतीचा आणि मारियाचा खून केल्याचा आरोप हरबकच्या पत्नीनं केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
















