पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) लाच घेतल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे (Keshav Gholve) यांना अटक झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
घोळवे यांनी फिर्यादी व्यापाऱ्याकडून ५५ हजार रुपये खंडणी उकळली आहे. यानंतर घोळवे फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी करत होते. पण पैसे देण्यास नकार दिल्याने घोळवे यांनी संबंधित व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मोहम्मद तय्यब अली शेख असं फिर्यादी व्यापाऱ्याचं नाव आहे. त्यांनी पैसे देण्यास विरोध केला असता, घोळवे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर व्यापारी मोहम्मद शेख यांनी पिंपरी पोलीस स्टेशन ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा चौकशी केल्यानंतर पोलिसांनी भाजपचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह गुड्डू उर्फ प्रमोद यादव, मलका यादव, घनश्याम यादव आणि हसरत अली शेख यांना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दुसरीकडे, केशव घोळवे यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असून त्यांना या प्रकरणात गोवलं जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांनी केला आहे. या प्रकरणी आपण वरिष्ठांना तक्रार करणार असून घोळवे यांच्यावरील कारवाई राजकीय दबावातून झाली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे याआधी देखील होर्डिंग लावण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी भाजपच्या विद्यमान स्थायी समिती अध्यक्षाला अटक केली होती.