मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.
खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे की, ‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा रेमडेसिविरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना मनाई केली, असा खोडसाळ आणि असत्य आरोप नवाब मलिक यांनी ट्वीट करून केला. या त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा त्यांनी आतापर्यंत दिलेला नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला, राज्याचे मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहचवले, करोनाच्या महासाथीत अफवा पसरवली तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी तसेच त्यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंदवून कायद्याच्या योग्य कलमांनुसार शिक्षा घडवावी,’ असं पाटील यांनी नमूद केलं आहे.
नवाब मलिक काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी सलग ट्वीट करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. ‘केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. तसंच, केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर कंपन्यांनी हे रेमडेसिवीर दिले तर त्या कंपन्यांचे परवाना रद्द केले जातील अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला होता.