जळगाव : पोलिसात तक्रार देण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त सैनिक फत्तेलाल अर्जुन पाटील (वय ६०, रा. एकलहरे, ता. अमळनेर) यांच्यासह सहा जणांना पोलिस ठाण्यात डांबून ठेवणे होते. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्याकडे १ लाखांची खंडणी मागितली होती. सन २०२३ मधील या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार दि. १७ ऑगस्ट रोजी मारवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व दोन हवालदारांविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथील फत्तेलाल पाटील यांना गावातील एका जणाने अश्लील शिवीगाळ करीत वाद घातला होता. त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी माजी सैनिक फत्तेलाल पाटील हे अन्य पाच जणांसह दि. २९ एप्रिल २०२३ रोजी मारवड पोलिस ठाण्यात गेले होते. त्या वेळी तेथे त्यांची फिर्याद न घेता सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या एका खोलीत डांबून ठेवले होते. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आलेले अंमलदार भरत ईशी, पोहेकॉ रेखा ईशी, पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील यांनी फिर्याद घेतलीच नाही उलट समोरील व्यक्तीला बोलवून त्याच्याकडून फिर्याद घेत वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पैसे न दिल्याने गुन्हा दाखल करुन केली होती अटक माजी सैनिक फत्तेलाल पाटील यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र त्यांची मागणी पुर्ण झाली नव्हती. त्यामुळे समोरील व्यक्तीच्या फिर्यादीवरून फत्तेलाल पाटील यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती.
तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री मारवड पोलिस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे, पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोहेकॉ भरत ईशी, पोहेकॉ रेखा ईशी यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३४१, ३८४, ३८५, ३२३, ४६४, १२० (ब ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.
कारवाई न झाल्याने घेतली न्यायालयात धाव
जामीन मिळाल्यानंतर पाटील यांनी या संदर्भात पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यात चौकशी झाली, मात्र डांबून ठेवलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध दिलेला अहवाल पाहता कारवाई न झाल्याने फत्तेलाल पाटील यांनी अमळनेर न्यायालयात धाव घेतली. त्यात न्यायालयाने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.