मुंबई (वृत्तसंस्था) भाजपच्या २२ मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला?” असा सवाल विचारत काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस, असा बोचरा वार वाघमारेंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
ट्विटवर ट्विट करत डॉ. वाघमारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा हल्लाबोल केला आहे. भाजपच्या २२ मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप करण्यात आले होते. मग या २२ मंत्र्यांपैकी कोणी राजीनामा दिला?, असा सवाल डॉ. वाघमारे यांनी विचारला आहे. अमित शहा यांच्या काळात पुलवामा घडले. त्यावेळी शहा यांनी राजीनामा दिला का?, भाजपच्या सर्व मंत्र्यांचे न्यायाधीश फडणवीस कसे झाले होते?… भाजपने २०१४ पासून त्यांच्या खडसे सोडून कोणत्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर चौकशी लावली?, असे प्रश्नावर प्रश्न डॉ. वाघमारे यांनी विचारले आहेत.
वनमंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राठोड यांना तातडीने पायउतार व्हावे लागले. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आरोप केल्यानंतर त्यांचा राजीनामाा का घेतला नाही, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला होता. त्यावर डॉ. राजू वाघमारे यांनी वरील उत्तर दिले आहे. डॉ. वाघमारे पुढील ट्विटमध्ये म्हणतात की, १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद झाली हे खरे. परंतु ती त्यांना डिस्चार्ज मिळाला त्या दिवशीच हॉस्पिटलच्या आवारात झाली. खोटे बोलून संभ्रम तयार करायचा… सत्ता गेल्यावर काही माणसांचे संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस.भाजप नेत्यांनी हे कृपा करून तपासून घ्यावे.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढला आहे. देशमुख क्वॉरंटाईन होते तर त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी सुरक्षारक्षकांच्या लवाजम्यात पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
देवेंद्र फडणवीस यांनी थेट १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला. “देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”, असा सवाल फडणवीस यांनी केला.