मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेपासून दूर झाल्यावर शिंदे व फडणवीस सरकार आले तर काही दिवाळीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस एकाच व्यासपिठावर आल्याने चर्चा सुरु झाल्या होत्या. मनसेदेखील शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चेला उत आला आहे. दरम्यान, आज पुन्हा मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात राज्यात पुन्हा युतीची चाहूल अशी चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटींमागे राजकीय कारण नसल्याचं सांगितलं जात असलं तरी आगामी काळात मनसे शिंदे गट युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आता प्रशांत दामले यांच्या साडेबारा हजाराव्या प्रयोगाला तिघे एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्कवरील दीपोत्सवानंतर आज तिन्ही नेते पुन्हा एकत्र येणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्या आहेत. कधी एकमेकांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी, कधी शिवाजी पार्कातील दीपोत्सव, तर कधी एखाद्या एका उद्योजकाच्या समाजोपयोगी प्रकल्पासाठी एकत्र येत आहेत.
इतकेच नव्हे तर महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यालाही दोघे एकाच मंचावर पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, राजसाहेब आणि मी अनेकवेळा एकत्र येतोय. गेल्या दहा वर्षांतला बॅकलॉक भरून काढतोय. असं मोठं विधान केलं. त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरे यांच्या सतत होणाऱ्या भेटींमागे आगामी काळातील युतीची नांदी तर नाही ना अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.