जळगाव (प्रतिनिधी) नवीन अविभाज्य शर्थीच्या जमिनीचे भोगवटा वर्ग १ मध्ये रुपांतर करुन कृषिक विक्रीसाठी परवानगी पत्रावर तसेच विक्रीच्या आदेशावर महसुल सहाय्यकाने तहसिलदारांची बनावट सही केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा महसूलाचे नुकसान झाले असून याप्रकरणी महसूल सहाय्यक गजानन नरोटे यांच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बोदवड येथील नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीचे भोगवाटा वर्ग एकमध्ये रुपांतर करून कृषिकसाठी विक्री परवानगी मिळावी. यासाठी संबंधित शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. या मिळकतीच्या बाजारभावाच्या मूल्यांकन रकमेच्या ७५ टक्के रक्कम ३ लाख २६ हजार २५२ रुपये सरकारी खजिन्यात जमा करावी. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना दि. २७ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांच्या स्वाक्षरीनिशी कळवण्यात आले होते. मात्र त्यानंतर संबंधित अर्जदारांना दि.३ नोव्हेंबर २०२३ रोजी बाजारभाव मूल्यांकन रकमेच्या ५० टक्के रक्कम २ लाख २४ हजार १६३ रुपये सरकारी खजिन्यात जमा करण्याबाबत कळवण्यात आले. तसेच या पत्रावर तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांनी स्वाक्षरी नसून ती बनावट असल्याचे लक्षात आल्याने अव्वल कारकून गणेश हटकर यांनी नंदुरबार येथे बदली झालेल्या लोखंडे यांना कळवले.
बनावट स्वाक्षरी करुन केले महसूली रकमेचे नुकसान संचिके संदर्भातील सर्व कामकाज व संचिकेचे अभिलेख जतन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेतील महसूल सहाय्यक गजानन नरोटे यांची आहे. त्यांनीच तत्कालीन तहसीलदार लोखंडे यांना कोणतीही माहिती न देता दि. २३ ऑक्टोबर २०२३ ते दि. २ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान बनावट स्वाक्षरी करून शासनाच्या जमीन महसूल रकमेचे नुकसान केले आहे.
तपासणीत धक्कादायक प्रकार उघडकीस !
तत्कालीन तहसीलदार लोखंडे यांनी लागलीच जळगावला येवून त्यांनी पाहणी केली. यामध्ये त्यांना स्थळ पत्रावर स्थळ प्रत नमूद करताना महसूल सहाय्यक गजानन नरोटे याने तहसीलदारांच्या पदनामाच्या बाजूला स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. या शिवाय सदर जमीन विक्री परवानगी आदेशावर बनावट स्वाक्षरी असल्याचे त्यांना तपासणीत आढळून आले. या प्रकरणी तहसीलदार पंकज लोखंडे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून महसूल सहाय्यक गजानन नरोटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शांताराम देशमुख करत आहेत.
ई-ऑफिसमध्ये प्रलंबित असतांना केल्या स्वाक्षरी !
याचबरोबर रावेर तालुक्यातील जिन्सी येथील जमिनीसाठी केलेल्या अर्जाविषयी संचिका जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-ऑफिस प्रणालीमध्ये प्रलंबित आहे. असे असतांना ऑफलाईन पद्धतीने तहसीलदार लोखंडे यांची बनावट स्वाक्षरी करून आदेश देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात आढळून आला