चोपडा (प्रतिनिधी) प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वडिलांचं निधन झालंय. गौतमीने आपल्या वडिलांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं आज निधन झालं.
चार दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात सूरत हायवेवर बेवारस अवस्थेत आढळले होते. त्यांच्यावर धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. रवींद्र पाटील यांचे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर गौतमीने आपल्या वडिलांची जबाबदारी स्वीकारली होती. रवींद्र पाटील यांना धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळ्यातील रुग्णालयात दाखल केलं होतं.
याबाबतचं वृत्त गौतमीला माहिती समजल्यानंतर तिने आपल्या वडिलांना पुण्यात नेलं होतं. रवींद्र पाटील यांची धुळ्यात प्रकृती जास्त बिघडली होती. त्यामुळे गौतमीने त्यांना पुण्यात हलवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत गौतमीने व्हिडीओ जारी करत आपण माणुसकी म्हणून आपल्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारी घेतल्याचं म्हटलं होते. दरम्यान, मागील एक वर्षापासून गौतमी पाटील ह्यांना भेटण्याची इच्छा होती. त्यांची आपल्या मुलीला बघण्याची इच्छा अपूर्णच राहिली.
















