संगमनेर (प्रतिनिधी) फेसबुकवरील ख्यातनाम कुबेर ग्रुपने कोविड काळात केलेल्या कामाची दखल घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोवीड योद्धा’ हा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे.
कुबेर ग्रुपनेतर्फे संचलीत करण्यात येणार्या कुबेर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने कोविडच्या प्रतिकारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत करण्याचे ठरविले होते. कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असतांना कुबेर समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती. याआधी देखील कुबेर समूहाने अनेकवेळा आपली सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. त्यानुसार समुहाने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजोरी गावातील नदीचे रुंदीकरण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरे, शहादा तालुक्यातील आदिवासी लोकांचे सर्वरोग निदान शिबीर, महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे वृद्धाश्रम असो वा अनाथ आश्रमात सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, व्यसनमुक्ती केंद्रातील लोकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, वृद्धाश्रमातील लोकांसाठी वैयक्तिक आरोग्यदायी वस्तूंचे वाटप त्याचप्रमाणे प्रकाश आमटे, श्री व सौ. कोल्हे दांपत्याच्या मेळघाटातील संस्थेसाठी आर्थिक मदत, सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला आर्थिक मदत इत्यादी उपक्रम यापूर्वीही केलेले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोवीड योद्धा’ हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम रविवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे होणार असून या कार्यक्रमासाठी ना. आदित्य ठाकरे, ना. एकनाथ शिंदे, ना. बच्चू कडू, ना. आदिती तटकरे, पद्मश्री तात्याराव लहाने, राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.