पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील चुंचाळे शिवारात एका ५० वर्षीय शेतकरीने शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पाचोरा पोलीस स्थानकात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील बाळदबु येथील शिवारात चुंचाळे येथील रहिवासी वाल्मिक वामन पाटील(वय ५०) यांनी रतन बळीराम पाटील यांच्या शेतात २२ रोजी रात्री ९ ते ११ वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली होती. पाचोरा पोलिसात दिलेल्या मयताची पत्नी सपना पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत शेतकऱ्याच्या शेतावर यातील रतन बळीराम पाटील, योगेश रतन पाटील यांनी घेतलेल्या ट्रक्टरचा कर्जाचा बोजा बसवलेला असल्याने व सदरचे कर्ज न भरणा केल्याने तसेच मयतास दिलेल्या त्रासामुळे विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली होती. सदरचे कर्ज भरण्यासाठी यातील मयत वाल्मिक पाटील व त्यांची पत्नी यांनी वारंवार विनवण्या करुणसुद्धा त्यांनी कर्ज भरले नाही. या जाचास कंटाळून वाल्मिक पाटील यांनी विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली होती. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरी. गणेश चौभे हे करीत आहेत.