जळगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षांपासून सतत कोसळलेल्या कांदा दरांमुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून जळगाव बाजार समितीत चांगल्या दर्जाच्या कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांपर्यंत दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. उत्पादन खर्च वजा जाता थोडाफार नफा हाती लागत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी थांबली आहे.
जळगाव बाजार समितीत सध्या एरंडोल, धरणगाव आणि जळगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. दररोज सरासरी तीन ते चार हजार क्विंटल कांदा बाजारात दाखल होत असून, दर्जेदार कांद्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून चांगाल्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार रुपये दर दिला जात असल्याने गेल्या काळातील तोट्याची काहीअंशी भरपाई होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगावसह चाळीसगाव, अडावद व यावल या ठिकाणीही कांद्याचे लिलाव सुरू असल्याने त्या भागातील शेतकरी वाहतूक खर्च टाळण्यासाठी स्थानिक बाजारातच कांदा विक्रीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन मिळणारा दर थेट त्यांच्या हातात पडत आहे. तसेच निर्यातक्षम दर्जाचा कांदा थेट शेतातूनच व्यापारी उचलत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. याशिवाय चोपड्यासह जिल्ह्यातील काही शेतकरी दराचा अंदाज घेऊन सुरत व इंदूर येथील बाजारात कांदा विक्री करण्याचे नियोजन करत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कांदा दरातील ही सुधारणा टिकून राहिल्यास जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असून, शेतीतील आत्मविश्वासही वाढणार आहे.
















