जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकार व महावितरणने कृषिपंपधारकांना वीजबिलात भरघोस सवलतीसह नवीन कृषी वीज जोडणी तत्परतेने देण्यासाठी महा कृषी ऊर्जा अभियान सुरू केले आहे. या अभियानात वीजबिल भरून शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले.
महावितरणच्या मुंबई येथील सांघिक कार्यालयाचे सहायक महाव्यवस्थापक प्रवीण रहांगदळे व मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी मुक्ताईनगर येथे एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन त्यांना महा कृषी ऊर्जा अभियानाची माहितीपुस्तिका दिली. तसेच अभियानातील विविध योजनांचे सादरीकरण दाखवून या अभियानाचा लाभ घेण्यासाठी खान्देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रेरित करण्याची विनंती केली.
या अभियानाबद्दल खडसे यांनी समाधान व्यक्त करून या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास त्याचा फायदा महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता नक्की होईल, असा आशावाद व्यक्त केला. वीजग्राहकांना चांगली सेवा हवी असल्यास राज्यातील सर्व वीजग्राहकांनी आपले वीजबिल नियमित भरणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंपांच्या वीजबिलात भरघोस सवलत देण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपली वीजबिले भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.