बुलढाणा (वृत्तसंस्था) बाळापूर शहरा पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शेगाव रोडवरील न.प. डम्पिंग ग्राउंड जवळ २ दुचाकी गाड्यांना बोलेरो पीकअपने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना बुधवार दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या या अपघातात दोन्ही साडूभाऊ जागीच ठार झाले. तर दोन जखमी झाले असून त्यातील एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
प्रविण रमेश नेमाडे (वय ४५ रा. डोंगरगाव ता बाळापूर जि. अकोला) व त्यांचे साळू प्रमोद श्रीधर चोपडे )वय ५० रा. अकोली ता संग्रामपूर जि. बुलढाणा) हे दोघे हिरो पॅशन दुचाकीने शेगावकडून येत होते. तसेच ज्ञानेश्वर गजानन रोही (वय २६) व त्याचा चुलत भाऊ राहुल मधुकर रोही (वय २२, दोघेही रा. येवता ता. रिसोड जि. वाशिम) हे दोघेही आपल्या दुचाकीने शेगावकडून बाळापूरच्या दिशेने येत होते. याचवेळी शेगाव कडूनच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पीकअप गाडी (क्र. एम. एच.२८ बी.बी ३७१५) ने बाळापूर शहरा पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शेगाव रोडवरील न.प. डम्पिंग ग्राउंड जवळ जोरदार धडक दिली.
हा अपघात येवढा भीषण होता कि, दोन्हीही दुचाकीवरील ४ जण फेकले गेले तर बोलेरो पीकअप गाड़ी खड्यात गेली. या अपघातात प्रविण नेमाडे व त्यांचे साळू प्रमोद चोपडे हे दोघेही साळू साळू जागीच ठार झाले. तर ज्ञानेश्वर रोही व त्याचा चुलत भाऊ राहुल रोही हे दोघेही चुलत भाऊ जखमी झाले. त्यातील एक गंभीर जखमी झाला असल्याचे समजते. प्रवीण नेमाडे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बाळापूर पोलीस व ग्रामीण रूग्णालयाची १०८ क्रं. ची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले व मृतकांना ग्रामीण रुग्णालयात तर जखमींना अकोला येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी फरार मालवाहू वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.