जळगाव (सुरेश उज्जैनवाल) ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी खानदेश कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी केलेली निवड सर्वसामान्य राजकारण्यांच्या दृष्टीने भलेही अनपेक्षित असेल,पण पवारांच्या दृष्टीने ती दूरगामी आणि सर्व समावेशक विचारांनी उचललेले राजकीय पाऊल होय. रोहिणीची निवड करून पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यात वाटचाल कशी असणार आहे,याची ती एक झलक म्हणावी लागेल.
माजी मंत्री व राज्यातील बहुजन नेते आमदार एकनाथराव खडसे यांची कन्या म्हणून सामाजिक वलयाचा विचार त्या मागे काही प्रमाणात असला तरी व्यक्तित्वाच्या अंगाने विचार केल्यास श्री पवारांनी तिच्यातील क्षमता, योग्यतेचा विचार अधिक कारणीभूत आहे. तिच्या व्यक्तिमत्वाचे तटस्थपणे निरीक्षण केल्यास एकाच वेळी अनेक गोष्टींचे भान ठेवून सर्व बाबी पूर्ण करण्याची तिच्यात विलक्षण क्षमता असल्याचे दिसून येते.
अनेक टप्प्यातून जाताना प्रत्येक वेळी ती नवे काही शिकण्याचा प्रयत्न करते हे पाच वर्षे निर्विवादपणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी काम करतांना अनुभवास आले आहे. स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन तिने स्वत:साठी व्यापक केल्याचे जाणवते. राजकारण ही तारेवरची कसरत असली तरी नावीन्यपूर्ण ध्येय्य गाठण्याचा अट्टाहास तिच्या व्यक्तीमत्वात दिसून येतो. म्हणूनच श्री पवारांनी प्रदेश स्तरावरील जबाबदारी दिल्याचे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. पक्ष संघटना बांधणी संदर्भात शरद पवार कार्यकर्ता /कार्यकर्ती यांची क्षमता, आचार,विचार,व्यवहार आणि योग्यता लक्षात घेवून संधी देतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे.
निश्चितच रोहिणीताई बाबत नेमका हा विचार आणि निकष असावा. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण समाजकारण आणि वेगाने होणाऱ्या बदलाचा अचूक अंदाज व दिशा जेवढी श्री पवारांना कळते तेवढी जाण अथवा क्षमता असलेला दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. राजकारणाचे वारे आगामी काळात कुठल्या दिशेने वाहतील त्याचा अंदाज घेवून पुढची दिशा ते ठरविता. त्यामुळे पक्षाच्या महिला आघडीच्या प्रदेशाध्यक्षपदी रोहिणीताईंची निवड गुणवत्ता आधारित झालेली असावी. पक्षात नवीन पिढी तयार करण्याची कवायत पवारांनी सुरू केल्याचेच हे द्योतक म्हणता येईल.
आव्हानात्मक पण भविष्याची मोठी संधी देखील..!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला आघाडीच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्याचे काम आव्हानात्मक असले तरी आपल्या उपजत गुणाचा पुरेपूर वापर करीत प्रभाव निर्माण करण्याची ही रोहिणी ताईस नामी संधी आहे. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ताई परिपूर्ण असून त्या निश्चीत पणे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील . त्यांच्या या नव्या जबाबदारीस व पुढील वाचालीसाठी शुभेच्छा…..!
सुरेश उज्जैनवाल (ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया)