कुन्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील वढोदा वन परिक्षेत्राच्या चारठाणा नियतक्षेत्रात वन विभागाच्या गस्ती पथकावर डिंक तस्करांनी जिवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये गावठी बॉम्ब गोळे आणि गोफनचा वापर करण्यात आला. परंतु, सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. पण, चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.
वढोदा वन विभागाचे वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचारी हे १२ फेब्रुवारीला चारठाणा परिमंडळात गस्त घालत होते. वनखंड क्रमांक ५५१मध्ये असताना जंगलातील डिंक गोळा केला जात आहे, असे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, गस्ती पथक पुढे गेल्यावर त्यांच्यावर टेकडीवरून गोफणने दगडाचा मारा सुरु झाला. अचानक सुरू झालेल्या गोफणीचे दगड व गोळ्यांमुळे पथकातील अधिकारी व कर्मचारी वन विभागाच्या चारचाकी वाहनात बसून तस्करांच्या दिशेने निघाले. या वेळी हल्लेखोरांनी जंगलात आग लावली. दरम्यान, वणवा आटोक्यात आणून वनाधिकारी व पथकातील अधिकारी व कर्मचारी पुढे आरोपींच्या दिशेने सरसावले. तर अचानक गाडीचे पुढील चाक फुटण्याचा मोठा आवाज झाला. त्यानंतर गाडीतील कर्मचारी मोठ्या हिमतीने खाली उतरले. त्यांनी तेथे पाहणी केली असता रस्त्यावर हल्लेखोरांनी जमिनीत गावठी बॉम्ब गोळे पेरलेले आढळून आले. हा थरार रात्री ११ वाजेच्या सुमारास जंगलात सुरू होता. तरीही वन विभागाचे पथक माघारी फिरले नाही. दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन डिंक तस्कर पसार झाले आहेत. परंतु, वन विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी एक संशयितास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात आरोपींवर वन विभागाच्या नियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून एक संशयितास ताब्यात घेतले आहे. या आणि मध्यप्रदेश वन विभागाच्या मदतीने सुरू आहे, असे वनाधिकारी परिमल साळुंखे यांनी सांगितले.
यांचा होता वन विभागाचा गस्ती पथकात समावेश
वन विभागाला समजलेल्या माहितीनुसार, वढोदा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे यांच्यासह वनपाल भावना मराठे, वनरक्षक अक्षय मोरे, वनरक्षक उमेश तायडे, वनरक्षक सुधाकर कोळी, वनरक्षक कविता पावरा यांच्यासह वनमजूर नीलेश तायडे, योगेश बोरसे, किशोर पुरकर, नितीन वाघ, विशाल खिरळकर, गौतम मोरे यांचा वन विभागाचा गस्ती पथकात समावेश होता.
डिंक तस्करांनी मध्य प्रदेशकडे ठोकली धूम
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अवैध डिंक तस्करांकडून गोफणच्या सहाय्याने दगडांचा मारा केला. तर, पळताना जंगलात लावलेली आग, रस्त्यावर जमिनीत पुरवून ठेवलेले गावठी बॉम्ब एवढे असल्यानंतरही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आरोपींचा पाठलाग करतच होते. मात्र, त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन सातपुड्यातून मध्य प्रदेशकडे धूम ठोकली.