चाळीसगाव (प्रतिनिधी) लोंजे आंबेहोळ येथील आशा वर्कर कमलताई पवार यांची मुलगी हर्षदाचा काही महिन्यांपूर्वी सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला होता, उपचारासाठी खूप उशीर झाल्याने प्रयत्न करूनही माझ्या एका भाचीला वाचवू शकलो नाही याची खंत आजही माझ्या मनात आहे. आज भाऊबीज सोहळ्यात त्या भगिणीने त्या प्रसंगाची आठवण करून देताच माझ्यासह उपस्थितांना गहिवरून आले… मी जेव्हा त्या बहिणीचे सांत्वन करण्यासाठी घरी गेलो तेव्हा ती माझ्या गळ्यात पडून रडली होती, रक्ताच्या नात्यापेक्षा एक वेगळे नाते माझे सर्वांशी जुळले आहे. माझे तालुक्यातील सर्व माता – बहिणींना आवाहन आहे की “तुम्ही भलेही मला सुखात बोलावू नका पण दुःखाच्या क्षणी, संकटाच्या वेळी या भावाला सर्वात आधी आवाज द्या..!” असे आवाहन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील १५०० हून अधिक आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका यांच्या सन्मानार्थ आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने भाऊबीज सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. लोंजे आंबेहोळ येथील आशा वर्कर कमलताई यांनी त्यांच्यावर आलेला दुखद प्रसंग कथन करत असताना सांगितले की माझ्या मुलीना सर्पदंश झाला आहे हे लक्षात आल्यानंतर माझा सख्खा भाऊ वेळेवर आला नाही पण मी आमदार मंगेश दादांना फोन केला आणि ते लगेच हजर झाले. रक्ताचा नाही पण हक्काचा माझा भाऊ माझ्यासाठी धावून आला हे सांगताच आमदार चव्हाणांसह उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
विशेष म्हणजे यावर्षी आमदार चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी हा कार्यक्रम मंगल कार्यालयात न घेता आपल्या शिवनेरी या निवासस्थानी आयोजित केला होता. जर आपण बहिणीला भाऊबीज भेट देत असू तर माझ्या बहिणींचे पाय माझ्या घरी लागावे अशी भावना त्यांनी यामागे बोलून दाखवली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश, जिल्हा व मंडल पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, शिवनेरी फाउंडेशनचे सदस्य आदी उपस्थित होते.
१५०० हून अधिक बहिणींच्या मुलीच्या लग्नासाठी आमदार चव्हाण देणार प्रत्येकी २५ हजार
“भाऊबीज सोहळा” सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका यांच्या एका मुलीच्या लग्नासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत मागील वर्षी बरोबर १ जानेवारी २०२२ रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केली होती. स्वखर्चाने असलेल्या या उपक्रमाला त्यांनी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले – शुभमंगल कर्तव्य” योजना नाव दिले असून यावर्षी ३४ विवाह सोहळ्यांसाठी ८ लाख ५० हजारांची मदत देण्यात आली आहे. पुढील काळात या सर्व १५०० बहिणींचा भाऊ म्हणून भाचींच्या लग्नासाठी प्रत्येकी २५ हजार मदत देण्याची मोठी जबाबदारी सोबतच त्यांच्या शासन दरबारी असो वा वैद्यकीय, कौटुंबिक अडचणी असो मी एक भाऊ म्हणून शक्य ती मदत करणार असल्याचे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले.
आया-बहिणींच्या अबोल भावनांना फुटला कंठ…
देवाने कन्यादान माझ्या नशिबी नाही दिले पण वेळ काढून तुम्हीच माझ्या मुलीचे कन्यादान करा…
जामदा येथील आशासेविका भारती अशोक पाटील या विधवा आहेत, त्यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या की, दादा दरवर्षी आम्हाला हक्काने जी साडी देतात त्याची किंमत पैश्यात नसून एक आमदार आमचा भाऊ आहे आणि ते आम्ही जगाला अभिमानाने सांगू शकतो याचा जास्त आनंद होतो. माझी मुलगी लग्नाच्या वयाची असून लवकरच तिचे लग्न होईन तेव्हा मंगेशदादा २५ हजाराचा आहेर आणतीलच मात्र दुर्दैवाने मी विधवा असल्याने परमेश्वराने मला कन्यादानाचे भाग्य दिले नाही. माझ्या मुलीच्या लग्नात तुम्ही कन्यादान करा अशी इच्छा भारती ताईंनी बोलून दाखवली.
दादा, माझ्या अंत्ययात्रेच्या डोलीवर जाण्याआधी तुझ्याच हाताची साडी आण…
आईवडील-भाऊ नसलेल्या भामरे येथील अंगणवाडी मदतनीस सुशीला बाविस्कर यांनी बोलून दाखवली शेवटची इच्छा..!
आमदार म्हणाले – ताई… काळजी करू नको, तुझी बोळवणच काय मुलगा बनून तुझे उत्तरकार्य आदी सर्वच विधी मी करतो
जवळपास ३ तास सुरु असलेल्या या भाऊबीज सोहळ्यात अनेक हृदयस्पर्शी प्रसंग अनुभवायला मिळाले. अनेक आशा ताई, अंगणवाडी सेविका उत्स्फुर्तपणे मनोगत व्यक्त करत असताना भामरे येथील अंगणवाडी मदतनीस सुशीला विनायक बाविस्कर यांनी थेट स्टेजवर जाऊन बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्या म्हणाल्या की मी आयुष्यात प्रथमच स्टेजवर जाऊन बोलत आहे, आईवडील-भाऊ काहीच नाही, अनेक चुलत नाते गोते आहेत पण आमदारांनी जे नाते जोडले आहे ते मला सर्वात मोठ वाटत. म्हणून मी मेल्यावर माझ्या अंत्ययात्रेच्या डोलीत मंगेशदादांनी आणलेली साडीच नेसवावी… दादा भलेही तुम्ही ती २ रुपयांची जरी साडी आणली तरी चालेल पण ती तुमच्याच हाताची असावी अशी शेवटची इच्छा बोलून दाखवली. या भावस्पर्शी मागणीला आमदार मंगेशदादा चव्हाण यांनीदेखील आपल्या मनोगत, ताई… काळजी करू नको, या मी देवाला प्रार्थना करतो की माझ काही आयुष्य तुला लागू दे, तुझा दवाखाना मी करेन, पण शेवटची यात्रा कुणाला चुकत नाही ज्यादिवशी तुझी डोली उठेल त्यादिवशी तुझी बोळवण म्हणून साडीच काय तर मुलगा बनून तुझे उत्तरकार्य आदी सर्वच विधी मी करतो असे आमदार चव्हाण यांनी सांगताच सर्व उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले.
जिल्ह्यातील आशा सेविकांना भाऊबीज कार्यक्रमाचे आकर्षण !
आमदार मंगेश चव्हाण हे भाऊबीज निमित्ताने गेल्या ३ वर्षांपासून घेत असलेल्या या अनोख्या उपक्रमाची चर्चा जिल्ह्यासह राज्यभरात आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मदतनीस संगीता राजेंद्र पाटील व आशा गजानन साळुंखे या खास सामनेर तालुका पाचोरा येथून आल्या होत्या. याची माहिती आमदार चव्हाण यांना मिळताच त्यांनी त्यांचा सत्कार केला व भाऊबीज भेट म्हणून साडी देखील दिली.