
जळगाव (प्रतिनिधी): कौटुंबिक वादातून जावायाला मारण्याकरीता आलेल्या सासऱ्याने त्यांच्या चुलत भावांवर धारदार चाकू सारख्या शस्त्राने वार केले. यामध्ये मुकेश रमेश घुगे (वय ३८, रा. इच्छादेवी चौफुली) यांच्या छातीला तर सचिन घुगे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना दि. १९ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजता आदर्श नगरात घडली. याप्रकरणी निलेश पुंडलीक सपकाळे (वंजारी) (रा. आदर्श नगर) यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आदर्श नगरात राहणारे मुकेश घुगे यांचा चुलत भाऊ करण घुगे यांना मारण्याकरीता त्याचे सासरे निलेश सांगळे हे त्यांच्या घरी गेले होते. घराबाहेर उभे राहून दारुच्या नशेत ते शिवीगाळ करीत असल्याने मुकेश घुगे यांनी त्यांना मामा आपण घरात बसून बोलू असे सांगू लागले. त्यावर निलेश सांगळे यांनी तुम्ही मध्ये बोलू नका असे म्हणत शिवीगाळ करीत असतांना मुकेश यांनी त्यांना शिवीगाळ करु नका म्हणत समजवित असतांना त्यांनी चाकू सारख्या धारदार शस्त्राने मुकेश घुगे यांच्या छातीवर वार केला. यामध्ये त्यांच्या छातीला गंभीर दुखापत होवून पाच टाके पडले. तसेच दुसरा हा वार हा मुकेश यांच्या चेहऱ्यावर केला परंतू चुकविल्यामुळे ते वाचले. आवरणाऱ्यावर देखील केला हल्ला तो लहान भावावर वार होत असल्याने मुकेश यांचे भाऊ सचिन घुगे आणि किरण घुगे यांनी आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर देखील निलेश सांगळे यांनी वार केला. यामध्ये सचिन घुगे यांच्या पायाला गंभीर दुखापत होवून दोन टाके पडले तर किरण घुगे यांना कोणीतीही दुखापत झाली नाही मात्र त्यांचे पकडे फाटले.
जावायाला बघताच केली अश्लिल शिवीगाळ
हे भांडण सुरु असतांनाच निलेश सांगळे यांचा जावई करण घुगे हा तेथे आला. त्याला बघताच सांगळे यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करीत तुलाच मारायचे होते, तू वाचला असे म्हणत ते त्यांचा पुतण्यासोबत तेथून पसार झाले.
रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल
जखमी मुकेश घुगे यांनी उपचार घेतल्यानंतर रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार निलेश पुंडलिक सांगळे (वंजारी) (रा. आदर्श नगर) यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक संजय तडवी हे करीत आहे.
















