कोल्हापूर (वृत्तसंस्था) येथील एका साथीदारांच्या मदतीने स्वत:च्या मुलाचा सुपारी देत खून केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. राहुल दिलीप कोळी (वय ३१, रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे मृताचे नाव असून वडिलांनीच ७५ हजार रुपयांना सुपारी देऊन दोन साथीदारांसह खून केल्याची कबुली दिलीय.
नेमकं काय घडलं !
स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार वडील दिलीप कोळी याच्यासह विकास पवार (तारदाळ), सतीश कांबळे (तमदलगे) या दोघा साथीदारांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तारदाळ हद्दीतील रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
ल्वेला धडक बसून मृत्यू झाल्याचा बनाव रचला !
प्रथमदर्शी रेल्वेला धडक बसून मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, मृतदेहाच्या डोक्यावर घाव आणि काही अंतरापर्यंत रक्ताचे थेंब अन् थारोळे दिसून आले. यामुळे पोलिसांना वेगळाच संशय आला. पोलिसांनी नातेवाइकांकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना जबाबात विसंगती आढळल्याने वडील दिलीप व मोठा भाऊ सचिन यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करताच वडील दिलीप यांनी कौटुंबिक वादातून अन्य दोन साथीदाराच्या मदतीने राहुलचा खून केल्याचे कबूल केले.
…म्हणून केला मुलाचा खून !
राहुल हा विवाहित असून, तो मद्यपी असल्याने वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून त्याची पत्नी मुलासह माहेरी गेली आहे. त्यानंतरही त्याचा कुटुंबीयासोबत नेहमी वाद होत होता. यातूनच वडिलांनी स्वतःच्या खुनासाठी एकूण ७५ हजार रोख रुपये विकास पोवार व सतीश कांबळे यांना दिले. तसेच सुरुवातीला २५ हजार रुपये दिले आणि उर्वरित रक्कम खून झाल्यानंतर देण्याचा ठरले असल्याचेही पोलीस चौकशीतून समोर आले आहे.