चाळीसगाव (प्रतिनिधी) १९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीकडे असणारी हक्काची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्यामुळे चाळीसगाव राष्ट्रवादीत अन्यायाची भावना उफाळून आली आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांत निर्णय न बदलल्यास अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) चिंतन बैठकीत घेण्यात आला. यामुळे ‘मवीआ’चे वाढले टेन्शन वाढले आहे.
चाळीसगावची जागा ठाकरे गटाला सुटलीच कशी?
माजी आमदार राजीव देशमुख यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) चिंतन बैठकीत आपणच पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रमोद पाटील यांचे नाव सुचविले होते. तर जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी चाळीसगावची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढवावी, यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविल्या असल्याचे माध्यमांना सांगीतले. तर गेली ३० वर्षे सातत्याने ही जागा राष्ट्रवादी पक्ष लढत आला आहे. त्यामुळे या जागेवरचा दावा सोडू नये. तसेच सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राबल्य असताना चाळीसगावची जागा ठाकरे गटाला सुटलीच कशी? असा तीव्र संताप कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला.
उमेदवार न दिल्यास राष्ट्रवादीची पारंपारिक मते भाजपकडे वळण्याच्या भीती !
१९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादी चाळीसगावची जागा लढत आहे. नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीची पकड आहे. शहारासह चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत आहे. दुरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे चाळीसगाव तालुक्यातील सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व तसेच संघटन देखील कमकुवत आहे. तशात दोन दिवसांत निर्णय न बदलल्यास अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) चिंतन बैठकीत घेण्यात आलाय. राष्ट्रवादीला भीती आहे की, आपण उमेदवार न दिल्यास राष्ट्रवादीची पारंपारिक मते भाजपकडे वळू शकतात.
राष्ट्रवादीच्या हक्काची ‘वोट बँक’ भाजपकडे वळण्याच्या भीती !
माजी आमदार राजीवदादा देशमुख यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांची एक हक्काची वोट बँक आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी सत्तेचा उपयोग आपल्या मतदार संघासाठी केल्यामुळे चाळीसगाव तालुक्यात विविध विकास कामांमुळे ते चर्चेत आहेत. यामुळे राष्ट्रवादीला आपली हक्काची मते भाजपकडे वळण्याची भीती आहे. देशमुख परिवारावर प्रेम करणार वर्ग जर आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने वळला तर मात्र, शिवसेनेची मोठी गोची होणार आहे.
आ. मंगेश चव्हाण यांचे विरोधी पक्षातही राजकारणच्या पलीकडे संबध !
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात भरीव विकास कामे केली आहेत. शहरासह ग्रामीण भागात रस्त्यांचे मोठे जाळे त्यांनी तयार केले. कामे करताना त्यांनी सुरुवाती पासून पाक्षिक भेद ठेवला नाही. त्यामुळे सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधींच्या भागात सुद्धा मंगेश चव्हाण यांनी कामे केली आहेत. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षांसह अगदी राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबतही आ. चव्हाण यांचे राजकारणच्या पलीकडे व्यक्तिगत संबध असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार नसल्यास आमदार मंगेश चव्हाण यांच्याबद्दल सहानभूती निर्माण होत, ते राष्ट्रवादीच्या हक्काच्या ‘वोट बँक’मध्ये मोठी सेंध मारू शकतात, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.