जळगाव (प्रतिनिधी) जुन्या भांडणाच्या वादातून शहरातील गुरूनानक नगरात दोन गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी रॉड, तलवारीचा वापर करीत झालेल्या तुफान हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत.
सट्टयाचा आकडा लागल्याने त्याचे पैसे घेण्याच्या कारणावरून गुरुनानक नगरात रविवारी दुपारी तीन वाजता दोन गटात वाद उफाळून आला. यावेळी रॉड, तलवारीचा वापर करीत झालेल्या तुफान हाणामारीत सोनू भगवान सारवान (वय-२५) व नीलेश नरेश हंसकर (वय-१९) व बालण्णा लिंगण्णा गवळी सर्व रा. गुरुनानक नगर हे तीन जण जखमी झाले आहेत. दोघांवर जिल्हा रुग्णालयात तर गवळी याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुनानक नगरातील गवळी व सारवान गटात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. याच वादाच्या कारणावरून रविवारी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन्ही गट समोरासमोर आले. लोखंडी रॉड घेऊन आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळीने सोनू व नीलेश या दोघांवर हल्ला केला. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. या गटानेही केलेल्या हल्ल्यात बालण्णा गवळी जखमी झाला. या वादाच्यावेळी दोन्ही गटाकडून जमाव जमला होता. पोलिसांनी तातडीने जखमींना वाहनातून वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, उपनिरीक्षक अमोल कवडे, दिनेशसिंग पाटील, मुकुंद गंगावणे, कांबळे यांनी जमावाला पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, सोनू हा पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.