जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना काळात औषध, साहित्य, यंत्रसामुग्री खरेदीत झालेल्या गैरव्यवहार तसेच निव्वळ कागदोपत्री खरेदी दाखवून कोटयावधी रुपयांची फसवणुक करणाऱ्या अधिकारी कर्मचारी पुरवठादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे, या आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी आरोग्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांकडे स्वतः भेटून तक्रारी निवेदन दिले आहे.
दिनेश भोळेंनी दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात संबंधीत अधिकारी यांनी संगणमत करुन जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसेच कुटिर रुग्णालय याठिकाणी कोरोना या रोगाला नियंत्रण करण्यासाठी विविध प्रकारची यंत्रसामुग्री, औषधी व ईतर साहित्य खरेदी करण्यात तसेच नामांकित कंपनीच्या वस्तु निविदे प्रक्रियेत दाखवून खरेदी करतांना घरगुती बनावटीच्या अॅसेम्बल वस्तु खरेदी करून कोटयावधीच्या रकमेचा अपहार केला आहे.
याबाबत वेळोवेळी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. परंतु संबंधीत अधिकारी कर्मचारी यांचे व पुरवठादार यांचे संगनमत असल्याकारणाने प्रशासनामार्फत संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच पोलीस प्रशासनाकडे फिर्यादी दिली असता ती त्यांनी नोंदवून न घेता गेल्या दोन महिन्यापासून पोलीसांनी गुन्हा नोंद केला नाही. त्यामुळे संबंधीत खरेदी प्रक्रीया केवळ कागदोपत्रीच करण्यात आलेली आहे,वास्तविक जी खरेदी झालेली आहे. ती निविदेप्रमाणेच केली आहे किंवा नाही?, त्याची सखोल वस्तुनिष्ठ चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात यावा, असे भोळे यांनी म्हटले आहे.