अमळनेर (प्रतिनिधी) भारत देशाच्या पाठीवर आज २१ व्या शतकातही अनेक गावे रस्त्यापासून वंचित असून यात अमळनेर मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील शेवगे-पुनगाव या ग्रुप ग्रामपंचायतीच्या गावाचा समावेश असताना कार्यकुशल आमदार अनिल भाईदास पाटील यांनी स्थानिक विकास निधीतुन या गावाला पक्क्या रस्त्याची अनमोल अशी भेट दिली आहे. यामुळे सदर गावाच्या ग्रामस्थांसह पंचक्रोशीत सर्वस्व मिळाल्याचा आनंद व्यक्त होत आहे.
सदर रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात येऊन लागलीच कामाला देखील सुरुवात करण्यात आली. यादिवशी शेवगे आणि संपूर्ण पंचक्रोशीत अतिशय जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. कारण हा केवळ या गावातील ३००- ४०० लोकांचा प्रश्न नव्हता तर साऱ्या पंचक्रोशीतील समाजमन या रस्त्याच्या मागणीसाठी गुंतलेले होते. यामुळे भूमिपूजन प्रसंगी साऱ्यांनीच आमदारांचे अंतर्मनातुन आभार व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. रत्नमाला रोहिदास पाटील, पारोळा पंचायत समिती माजी उपसभापती अशोक नगराज पाटील, पंचायत समिती सदस्या, छायाबाई जितेंद्र पाटील, शेवगे- पुनगाव सरपंच भिकुबाई अरविंद देशमुख, उपसरपंच सौ. उषाबाई रवींद्रकुमार पाटील, ग्रा.पं.सदस्य दयाराम बळीराम पाटील, भुषण विलास पाटील, योजनबाई हरिश्चंद्र पाटील, मालतीबाई अनिल पाटील, दुध डेअरी चेअरमन विलास आधार पाटील, दुध डेअरी व्हा.चेअरमन हेमंत अशोक पाटील, वि.का.सो.सदस्य डिगंबर वना पाटील, सरपंच गोकुळ चिंतामण पाटील, कोळपिंप्री माजी उपसरपंच सुनिल पाटील व स्थानिक ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
अशी होती शेवगे पुनगाव ची व्यथा
शेवगे पुनगाव म्हणायला गेले तर ग्रुप ग्रामपंचायतीचे गाव मात्र आजपर्यंत या गावात बस देखील रस्त्या अभावी पोहोचू शकलेली नाही. रस्त्या अभावी तेथील ग्रामस्थांची किती परवड झाली व त्यांना आजतागायत किती दुःख भोगावे लागले याची प्रचिती काही अनेक दुःखद प्रसंगातून येते. येथील बाळंतिणीला चक्क बैलगाडीतून दवाखान्यात न्यावे लागत असे, काही वर्षांपूर्वी एका बाळंतीण महिलेला रस्त्या अभावी दवाखान्यात वेळेवर पोहोचता न आल्याने जीव गमावावा लागला होता, या घटनेने सारे समाज मन प्रचंड दुःखी झाले होते. वयोवृद्ध लोकांना तर वैद्यकीय अथवा कोणत्याही कामासाठी बाहेर कसे पडावे हा प्रश्न सतत होताच, तसेच शेतीसाठी लागणारी साधन सामुग्री, खते तसेच शेतात पिकविलेला शेतमाल तालुक्याच्या गावापर्यंत कसा न्यायचा, विद्यार्थ्यांची शाळा या साऱ्याच गोष्टी केवळ रस्त्याअभावी रखडलेल्या होत्या. अखेर येथील गावकऱ्यांचे इतक्या वर्षांचे दुःख जाणून घेत, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत उशिराने का असेना या प्रश्नावर स्थानिक आमदार अनिल पाटील यांनी लक्ष घातले. आणि रस्त्याचे केवळ आश्वासनच नाही तर प्रत्यक्षात कृती करुन दाखविली, आपल्या स्थानिक विकास निधीतून रस्त्याची अनमोल अशी भेट त्यांनी ग्रामस्थांना दिली.