मुंबई (वृत्तसंस्था) मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुख आज सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले. जबाब नोंदवण्यासाठी ते ईडी कार्यालयात दाखल झाले.
गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या, मात्र तरीही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. त्यांना अनेकदा समन्स बजावले होते, परंतू ते ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. त्यांचं म्हणणं ते वकिलांच्या मार्फत न्यायालयात मांडत होते. गेल्या पाच महिन्यांपासून विविध तपास यंत्रणा अनिल देशमुखांचा शोध घेत होत्या परंतु त्यांचा कोणताच शोध लागत नव्हता. मात्र आज अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.