जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील ब्रेन हॉस्पिटलजवळ गावठी बनावटीची अवैध पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणाला अटक केली असून त्याच्या ताब्यातील पिस्तूल जप्त केली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश मिलींद जाधव (वय-२१, रा. पिंप्राळा स्मशानभूमी जवळ) असे संशयित आरोपीचे नाव असून नितेश हा शहरातील ब्रेन हॉस्पिटल व शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाजवळील चहाच्या टपरीजवळ फिरत होता. त्यांच्या ताब्यात गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल बेकायदेशीर घेवून “मी जळगावचा दादा आहे, माझे कोणीही काही करू शेत नाही, पोलीस सुध्दा मला घाबरतात” असे म्हणून परिसरात दहशत निर्माण करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी तपासाचे चक्र रचत बुधवारी दुपारी संशयित आरोपी नितेश जाधव याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातील गावठी पिस्टल हस्तगत केली. दरम्यान, जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस अमंलदार संजय हिवरकर, राजेश मेढे, रवि नरवाडे, अविनाश देवरे, प्रदिप पाटील, जयंत चौधरी, दत्तात्रय बडगुजर, महेश महाजन यांनी ही कारवाई केली.