मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या जागी हेमंत नगराळे हे मुंबईचे पोलीस आयुक्त असतील. तर परमबीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित API सचिन वाझे यांच्या स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परमबीरसिंग यांची उचलबांगडी होणार अशी जोरदार चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. त्यांना होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पोलीस दलाबाबत सरकारचा मोठा निर्णय
– हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
– रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
– संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी
– परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी
पवारांचा परम बीर सिंहांना हटवण्याचा आग्रह
दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते.
कोण आहेत हेमंत नगराळे?
हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले. नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर असून फायनान्स मॅनेजमेंट विषयात त्यांनी मास्टर्स केलं आहे. १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नगराळे यांच्याकडे सध्या महासंचालकपदाची (कायदे व तांत्रिक विभाग) जबाबदारी आहे. त्यासोबतच त्यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही सेवा बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. १९९२ ते १९९४ या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते.