बोदवड (प्रतिनिधी) शहरात नियोजित केलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा शोधून द्या, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा जनसेवक विनोद पाडर यांनी दिला आहे.
विनोद पाडर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बोदवड ग्रामपंचायत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा नियोजित झाली होती. परंतू ती कुठे गहाळ झाली याचा आजपर्यंत थांग पत्ता नाही. ती जागा कुठे गेली?, याचा शोध घेऊन आता नगरपंचायतीने आरक्षित करून वॉल कंपाऊंड करून द्यावे. जेणेकरून जनतेतून वर्गणी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारता येईल. जर दोन महिन्याच्या आत ती जागा शोधून न दिल्यास 1 नोव्हेंबर 2022 रोजी वेळ सकाळी 11 वाजता नगरपंचायत आवारात स्वतःला जाळून घेईल,असा गंभीर ईशारा पाडर यांनी दिला आहे. निवेदनाची प्रत त्यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोडे व नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक सईद बागवान यांना दिली आहे. यावेळी पाडर यांचे समवेत गणेश शर्मा, नीलकंठ पाटील हे ही उपस्थित होते.