मुंबई (वृत्तसंस्था) आपली महत्वाची बँकांची काम असतील तर ती आज आणि उद्यापर्यंत उरकून घ्या. कारण परवा २६ मार्चपासून सलग ४ दिवस बॅंका (Bank) बंद राहणार आहेत. यामुळं सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. २८ आणि २९ मार्च रोजी बॅंक कर्मचारी संघटनांचा संप आणि २६ आणि २७ मार्च रोजी बॅंकांना सुट्टी असल्यानं मोठा परिणाम होणार आहे.
५ लाखांपेक्षा अधिक बॅंक कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी होणार
या संपामुळे स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक सोडता इतर सर्व बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. ५ लाखांपेक्षा अधिक बॅंक कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा करण्यात आला आहे. बॅंकांच्या खासगीकरणाला विरोध, बॅंकांमधील कंत्राटीकरण, बॅंकेतील कामाचे आऊटसोर्सिंग आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मुद्द्यांवर बॅंक कर्मचारी संपाच्या तयारीमध्ये आहेत.
या बरोबरच लोकसभेतील अधिवेशनात बॅंकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन, एआयबीओए, बेफी आणि महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन संपात सहभागी होणार आहे. सहकारी बॅंका, काही विदेशी बॅंका, जुन्या खासगी बॅंका, ग्रामीण बॅंकामधील कर्मचारी देखील संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा यावेळी केला आहे.
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी हा संप
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (AIBOC) ने सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सांगितले आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग अधिकाराचे हनन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.