मुंबई (वृत्तसंस्था) भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील नेत्यांना मोठा इशारा दिला आहे. मलाड पूर्वमध्ये भाजपा दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतांना दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, “सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात ३ मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या ३ जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले.” ठाकरे सरकारला लाज वाटत नाही का? हिंदूह्रदयसम्राटांचं नाव घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी आमचा विश्वासघात केला. नरेंद्र मोदींशी, भाजपशी विश्वासघात करा, पण हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राशी विश्वासघात आम्ही खपवून घेणार नाही,” असंही मत सोमय्या यांनी व्यक्त केलं.
किरीट सोमय्या म्हणाले, “समीर तु दलित नाही, तु मुस्लीम आहे. क्रांती रेडकर तुझा नवरा मुस्लीम आहे. त्याचं पहिलं लग्न नाही निकाह झाला होता. ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’, त्यांचा बाप नाही, ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवार यांना विचारा १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? दाऊदसोबत कोण बसलं होतं हे शरद पवार विसरले का? ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. दाऊदचा संबंध कुणाशी आहे, दाऊद कुणाचा बाप आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलंय.”