फैजपूर (प्रतिनिधी) तू तुझ्या घरी निघून जा…तुझ्यामुळे माझा संसार खराब होईल, असे सांगूनही न ऐकल्यामुळे संतापात एकाने सोबत घरी आणलेल्या महिलेच्या गळ्यावर धारदार ब्लेडने गळ्यावर वार करुन तिला विहीरीत ढकलून खून केला. या प्रकरणी खुमसिंग सरदार बारेला (वय ३३, रा. मोर धरणाजवळ हिंगोणा ता. यावल), याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या घटनेप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. परंतू पोलीस तपासात नंतर खुमसिंगने या महिलेचा खून केल्याचे उघड झाले. खून झालेल्या महिलेचे अंदाजे वय 45 वर्षवयोगटातील आहे. २८ एप्रिल २०२२ रोजी या घटनेतील मयत अनोळखी महिला अटकेतील संशयीत तरुण खुमसिंग सोबत त्याच्या घरी आली होती. त्यावेळी मयत महिलेने त्याच्या घरी राहण्याचा हट्ट केला. त्यावर तू तुझ्या घरी निघून जा…तुझ्यामुळे माझा संसार खराब होईल, असे त्याने तिला म्हटले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर संतापाच्या भरात खुमसिंगने त्याच्याकडे असलेल्या धारदार ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर तिला विहीरीत ढकलून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान, ती महिला कोण?, तिचे नाव काय?, दोघांचा संबंध काय?, हे आता पोलीस चौकशीत समोर येणार असून पुढील तपास स.पो.नि. निलेश वाघ पुढील तपास हे करत आहेत.