धुळे (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील नरडाणाजवळील वारूड येथून भागवत कथा पूर्ण करून काही भाविक मारुती इको वाहनाने शिंदखेडाकडे जात होते. यावेळी दसवेल फाट्यावर मारुती इको व पिकअप या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे. यासंदर्भात पिकअप चालकाविरुद्ध नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिंदखेडा येथून काही भाविक वारूड (ता. शिंदखेडा) येथे शनिवारी रात्री भागवत कथा
ऐकण्यासाठी गेले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भागवत कथा संपल्यानंतर वारूड येथील जयेश गुलाब बोरसे हे मारुती
इको गाडीने या भाविकांना घेऊन शिंदखेडा येथे सोडायला जात होते. यावेळी होळ गावाच्या पुढे दसवेल फाट्याजवळ समोरून येणाऱ्या पिकअपने मारुती इको गाडीला जोराची धडक दिली.
यावेळी गाडीत असलेले जयेश गुलाब बोरसे (२२, रा. वारूड, ता. शिंदखेडा), मंगलाताई लोटन देसले (५९, रा. शिंदखेडा), मयुरी पितांबर खैरनार-परदेशी (२८, रा. शिंदखेडा), विशाखा आप्पा महाजन (१३, रा. शिंदखेडा), सुनील दंगल कोळी (३०, रा. परसामळ, ता. शिंदखेडा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर या घटनेत आशा आप्पा माळी, प्रेम संदीप पाटील आणि खुशाल अरुण चौधरी हे तिघे गंभीर जखमी झाले असून सर्व शिंदखेडा तालुक्यातील आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये पिकअप वाहनचालक सचिन बापू चौधरी (रा. शिंदखेडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास स.पो.नि. नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.