जळगाव प्रतिनिधी -: पावसाळ्यात वादळी व संततधार पाऊस किंवा पूरपरिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती विद्युत यंत्रणा, उपकरणांपासून सावध राहावे, सर्व प्रकारची खबरदारी घेऊन सजग व सुरक्षित राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
घरात घ्यायची काळजी : सुरक्षिततेची पहिली पायरी!
आपले घर म्हणजे आपले सुरक्षित ठिकाण. पण पावसाळ्यात इथेही विद्युत अपघात होऊ शकतात. त्यामुळे विजेची उपकरणे, स्विच बोर्ड किंवा भिंती ओल्या असतील तर त्यांना अजिबात हात लावू नका. ओलसर हातांनी उपकरणे वापरणे टाळा. खिडक्या आणि बाल्कनीपासून विजेची उपकरणे दूर ठेवा. घरातील मीटरजवळ पाणी झिरपत असल्यास, तात्काळ मेन स्विच बंद करा आणि लगेच महावितरणला कळवा. मेन स्विचमध्ये चुकूनही तांब्याची तार वापरू नका. त्याऐवजी, वीजभाराला साजेसे अॅल्युमिनियम अलॉयचे विशिष्ट धातूचे फ्यूज वायर वापरा. यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होईल आणि मोठा धोका टळेल.
वायरिंगची तपासणी: तुमच्या घरातील वायरिंग जुनी झाली असेल तर त्वरित अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून ती तपासून घ्या. जुनी वायरिंग अपघातांना आमंत्रण देऊ शकते. खराब झालेली वायरिंग तात्काळ बदलून घ्या. वायरची जोडणी करताना ती तुकड्या-तुकड्यांमध्ये जोडू नका. जोडणी करावी लागल्यास चांगल्या इन्सुलेशन टेपचा वापर करा. याशिवाय, वीजजोडणीसाठी नेहमी ‘आयएसआय’ प्रमाणित साहित्यच वापरा. यात कोणतीही तडजोड नको! आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करा. मिक्सर, हिटर, गिझर यांसारख्या उपकरणांसाठी थ्री-पिन सॉकेट वापरा, कारण त्यात अर्थिंगची व्यवस्था असते. भिंत, लोखंडी पत्रा, फ्रिज, टीव्ही, संगणक किंवा पाण्याचे नळ यांना हात लावल्यावर तुम्हाला झिणझिण्या जाणवत आहेत का? हे धोक्याचे लक्षण आहे! तात्काळ तुमच्या वायरिंगची तपासणी करून घ्या. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ओलसर लोखंडी पाईप किंवा पाण्याच्या पंपाला स्पर्श करण्यापूर्वी कोरड्या रबरी/प्लॅस्टिकच्या चपला वापरा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नका. विद्युत उपकरणे दुरुस्ती करता ना मेन स्वीच बंद करा. विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्या. विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका.
सर्किट ब्रेकर महत्त्वाचे : आकाशात विजा चमकत असतील तर विद्युत उपकरणे बंद करून त्यांचे प्लग सॉकेटमधून काढून टाका.आपल्या घरामध्ये ‘ईएलसीबी’, ‘आरसीसीबी’ किंवा ‘एमसीबी’ सारखे सर्किट ब्रेकर बसवून घ्या. ही उपकरणे विजेचा दाब वाढल्यास, शॉर्टसर्किट किंवा अर्थ फॉल्ट झाल्यास वीजप्रवाह खंडित करतात आणि आपणास सुरक्षित ठेवतात.
सार्वजनिक विद्युत यंत्रणेपासून सावध राहा : जिवाला धोका टाळा!
घराबाहेरही विजेचे धोके दडून असतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वादळामुळे तुटलेल्या किंवा झुकलेल्या वीजतारा, खांब, रोहित्राचे कुंपण, फ्यूज बॉक्स यांसारख्या गोष्टींपासून सुरक्षित अंतर राखा. तुटलेल्या तारांना अजिबात हात लावू नका किंवा त्या हटवण्याचा प्रयत्न करू नका. विजेच्या खांबांना किंवा स्टे वायरला जनावरे बांधू नका, दुचाकी टेकवू नका किंवा कपडे वाळत घालू नका. शेतातील तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नका. विद्यूत वाहीनीच्याखाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका. कपडे वाळवण्यासाठी लोखंडी तारांचा वापर टाळा. टीव्हीची डिश किंवा अँटेना वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर ठेवा. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. पत्रा वीजेचा उत्तम वाहक असल्याने जास्त धोका असल्याचेही महावितरणने कळविले आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याची संभाव्य कारणे
पावसाळ्यात अनेकदा उन्हात तापलेले चिनी मातीचे इन्सुलेटर (चिमणी) पावसाने अचानक थंड होऊन तडकल्यास वीजप्रवाह खंडित होतो. खोदकामाने भूमिगत वाहिन्यांना धक्का लागल्यास किंवा पावसामुळे आर्द्रता निर्माण झाल्यास बिघाड होतो. झाडे कोसळणे, फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे यामुळेही वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. फिडर पिलर, रिंग मेन युनिटमध्ये पाणी शिरल्यास सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद करावा लागतो. वीज यंत्रणेजवळ टाकलेल्या कचऱ्यामुळे उंदीर, पक्षी यांसारखे प्राणी येतात आणि त्यांच्यामुळे शॉर्टसर्किट होऊन वीज जाते.
तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांकांसह विविध पर्याय:
वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास, महावितरण तुमच्या मदतीसाठी 24 तास तत्पर आहे, शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक 1912 किंवा 19120, 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या 24 तास उपलब्ध असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर तक्रार दाखल करू शकतात. वीजपुरवठा खंडित झाल्यास लगेचच फोन न करता 15 ते 20 मिनिटे वाट पाहून महावितरणला संपर्क करावा. वादळामुळे किंवा अतिवृष्टीमुळे तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहितीही या क्रमांकांवर देऊ शकता. याशिवाय, ज्या ग्राहकांनी आपले मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदणीकृत केले आहेत, ते 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल देऊ शकतात. तसेच, NOPOWER (12 अंकी ग्राहक क्रमांक)’ असा संदेश टाईप करून 9930399303 या क्रमांकावर पाठविल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविली जाईल आणि ग्राहकाला त्याची माहिती देणारा संदेश प्राप्त होईल.