अमरोहा (वृत्तसंस्था) भारत देशात पहिल्यांदाच एका गुन्हेगार महिलेला फाशी होणार आहे. या अपराधी महिलेला मथुरा येथील महिला तुरुंगातील फाशी घरात लटकवले जाईल. फाशी कधी होईल, याची तारिख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. शबनम असं महिला गुन्हेगाराचं नाव आहे. शबनमने प्रियकराच्या मदतीने कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती.
तसेच फाशी घराची डागडुजी आणि नवीन दोरीची ऑर्डर देण्यात आली आहे. मेरठमध्ये राहणाऱ्या पवन जल्लादने सांगितले की, मथुरा तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे. अमरोहा कोर्टाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सुप्रीम कोर्टात देखील आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिला आरोपीला फाशी होणार आहे. शबनमने आपला प्रियकर सलीमच्या मदतीने १५ एप्रिल २००८ रोजी आपल्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या केली होती. यामध्ये तिच्या आईवडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी आणि पुतण्याचा समावेश होता. शबनचे गाव बावनखेडी आहे. बावनखेडी गावचे सरपंच मोहम्मद नबी म्हणाले, २००८ साली झालेल्या हत्येनंतर आम्ही हादरून गेलो होतो. त्यावेळी गावातील अनेक मुलींचे नाव शबनम होते. त्यातील अनेक मुलींचे लग्न झाले आहे. २००८ सालानंतर गावातील एकाही व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव शबनम ठेवले नाही. शबनमला लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे, अशी गावकऱ्यांची भावना आहे.
१८७० मध्ये मथुरा तुरुंगात फाशी घर तयार झाले होते
महिलांना फाशी देण्यासाठी मथुरा तुरुंगात १८७० मध्ये फाशी घर बनवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर या फाशी घरात कोणत्याच कैद्याला फाशी देण्यात आली नाही. अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत पडलेल्या या फाशी घराची डागडुजी करण्यासाठी अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी उच्चाअधिकाऱ्यांना पत्र लिहीले आहे. परंतु, त्यांनी शबनमला फाशी देण्याच्या प्रश्नावर भाष्य केले नाही.