धरणगाव (प्रतिनिधी) येथील काँग्रेसचे नेते तथा प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव डी. जी. पाटील हे भाजपत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. माजी खासदार उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर जळगाव जिल्हा कॉंग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.
श्री. पाटील यांना ईडी, बीडीचा कोणताही धाक नाही. ‘एलआयसी’मधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले ‘एलआयसी’चे विकास अधिकारी आहेत. अगदी सुरवातीपासून काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. विधानसभा निवडणूक लढविली आहे, असे असताना अचानक काँग्रेस का सोडत आहेत?, असा विचार कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मात्र श्री. पाटील हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे गुरुवारी (ता. १५) मुंबईमध्ये भाजपचे प्रमुख नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत पाटील यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.
यापूर्वी श्री. पाटील यांचे चिरंजीव चंदन पाटील हे भाजपवासी झाले आहेत आणि नव्याने स्थापन झालेल्या डॉ. हेडगेवारनगर ग्रामपंचायतमध्ये भाजपकडून उपसरपंचपदी विराजमान आहेत. चंदन पाटील यांच्या प्रवेशावेळी श्री. पाटील यांनी ‘मी काँग्रेसमध्येच आहे’, असे जाहीर केले होते. अवघ्या एका वर्षात पाटील हे देखील भाजपवासी होत आहेत.
याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून, डी. जी. पाटील यांनी फार पूर्वी ‘आरएसएस’मध्ये काम केले होते. श्री. पाटील यांचे व्यक्तिमत्व सर्वसमावेशक असून, त्यांचे सर्वपक्षीय मित्रांचा गोतावळा मोठा आहे. त्यामुळे सर्वांनाच श्री. पाटील हे आपलेच आहेत, असे वाटते. मात्र सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखात मिसळणार आणि सर्वसामान्य माणसाला जिव्हाळा असलेले व्यक्तिमत्व पाटील यांचे आहे. श्री. पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चेने तालुक्यातील भाजप सुखावली आहेत तर कॉंग्रेसचे मात्र, इंडिकेटर लागले आहेत.
काँग्रेसमध्ये जो मानसन्मान मिळाला, तो अशोकरावांमुळे मिळालेला आहे. अशोकराव आमचे प्राण आहेत. त्यामुळे अशोकराव जिथे असतील तिथे आम्ही राहू, अद्याप भाजपमध्ये जाण्याच्या निर्णय नाही. मात्र भविष्यात काही सांगता येत नाही.
– डी. जी. पाटील, धरणगाव
















