मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि त्यांचे वकिलांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. वरळीतल्या सुखदा इमारतीतून बाहेर पडत असताना गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात घेण्यात आलं. एकूण १० जणांच्या पथकाने ही कारवाई केल्याचं कळतंय.
अनिल देशमुख यांचा वरळी येथील सुखदा इमारतीत फ्लॅट असून तिथे गौरव चतुर्वेदी आले होते. ते तिथून बाहेर पडल्यावर वरळी सी लिंकजवळ सीबीआयच्या दहा जणांच्या टीमने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. चतुर्वेदी यांच्यासोबत देशमुख यांचे वकील होते. त्यांनाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून देशमुख कुटुंबीयांनी सीबीआयवर गंभीर आरोप केला आहे. गौरव चतुर्वेदी यांचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एकप्रकारे अपहरणच केल्याचा त्यांचा आरोप आहे.
अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला असून याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात आजवर गौरव चतुर्वेदी यांचे नाव एकदाही पुढे आले नव्हते. मात्र, त्यांना अचानक ताब्यात घेण्यात आल्याने देशमुख कुटुंबीयांना मोठा हादरा बसला आहे.