रायगड (वृत्तसंस्था) महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. कोविडची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते.
विद्यार्थी काँग्रेसमधून जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेस मध्ये अनेक पदे भूषवली. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते.
सध्या रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाले. परंतु पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचे काम जगताप यांनी केले होते. आज दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघेल.