मुंबई (वृत्तसंस्था) माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ७४ वर्षाचे होते. न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती.
नवी मुंबईत नेरुळमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धनंजय जाधव यांचा जन्म १९४७ मध्ये पुसेगावात झाला. प्राथमिक शिक्षण मूळगावीच, तर माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एमएससी ही पदव्युत्तर पदवी घेतली. आधी ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. धनंजय जाधव यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन १९७३ मध्ये भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. आधी धुळे, नंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केलं.
मुंबई पोलीस आयुक्तपदाचीही धुरा
काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले. तर २००७ मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. निवृत्तीनंतर २ वर्ष MPSC बोर्डावर त्यांनी काम केले. धनंजय जाधव यांनी सामाजिक कार्यासोबत निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी काम केले.
















