धरणगाव (प्रतिनिधी) येथील महाविद्यालयाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात स्व. प्राचार्य डाॅ.ग. म. तल्हार यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या शोकपूर्ण भावना व्यक्त केल्यात.
अध्यक्षस्थानी संचालक अजय पगारिया हे होते. प्रारंभी प्रभारी प्राचार्य डाॅ.किशोर पाटील यांनी सभेच्या आयोजनाची भूमिका मांडून तल्हार सरांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी बांधवांतर्फे अविनाश पारेख यांनी आदरांजली वाहिली. कोर्ट केसेस, विद्यापीठातील राजकारण, संस्थांतर्गत वादविवाद आणि दैनंदिन प्रशासन यात गुरफटलेले असूनही तल्हार सरांनी अत्यंत स्थितप्रज्ञारू विकास केला, असे पारेख यांनी सांगितले. ज्यु.काॅ.तर्फे प्रा.बी.एल.खोंडे यांनी तल्हार सरांच्या आठवणी जागविल्या.सरांनी आमच्यावर पुत्रवत् प्रेम केले.सांभाळून घेतले. असे प्राचार्य पुन्हा होणे नाही, असे सांगितले. प्रा. रमेश महाजन यांनी तल्हार सरांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीत पदभार सांभाळला. तिथून सरांनी राजीनामा देईपर्यंतचा जीवनपट उलगडून सांगितला. सर अत्यंत निरहंकारी होते. संकट मोचक होते. हजरजबाबी होते. प्रसंगानुसार वागून सर्वांना सांभाळून स्टाफ व मॅनेजमेंटमधला दुवा आणि संरक्षक भिंत बनून राहिले.
अनेकांना नोकर्या दिल्या. संसार उभे केले. पण उपकारकर्त्याची भावना न ठेवता माणूसकीच्या भावनेने सर्वांशी शेवटपर्यंत कौटुंबिक स्नेहबंध टिकवले. यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे, अशा शब्दात प्रा.रमेश महाजन यांनी आदरांजली वाहिली. ह भ प प्रा.सी एस पाटील यांनी तल्हार सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित विविध उपक्रमांची माहिती देऊन त्यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला. सरांनी सर्वांचा पोटच्या लेकरा सारखा सांभाळ केला. आपपर भाव न ठेवता समान वागणूक दिली असे सांगून सरांच्या जीवनातील काही प्रसंग वर्णन करुन सांगितले.जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।उदास विचारे वेच करी॥ या संतवचनानुसार ते जीवन जगले. प्राचार्यापेक्षा पालकाची भूमिका त्यांनी अधिक साकार केली. या प्रसंगी निवृत एन सी सी मेजर प्रा.एम ए उपासनी यांनी फोन काॅलवरुन श्रद्धांजलीचे मनोगत व्यक्त केले. प्रा.व्ही आर पाटील यांनी अत्यंत रसाळ व ओघवत्या शैलीत सूत्र संचालन केले. शेवटी शांति मंत्राने समारोप करुन सर्व उपस्थितांनी तल्हारसरांना आदरांजली वाहिली.