नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाबमध्ये मोठी उलथापालथ झाली असून आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसला पछाडत सत्तेचे सुत्र आपल्या हाती घेतील, असे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amarinder singh) यांचा पराभव झाला आहे.
आपनं जवळपास ९० जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस १८ जागांवर आघाडी आहे. निवडणूक निकालांतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह पराभूत झाले आहेत. पटियाला मतदार संघातून अमरिंदर सिंह यांचा पराभव झाला आहे. पटिलायामध्ये आम आदमी पक्षाचे अजित पाल सिंह कोहली विजयी झाले आहेत.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह तब्बल १४ हजार मतांनी पराभूत झाले आहेत. आपचे उमेदवार अजीत पाल सिंह कोहली यांना जवळपास १४ हजार मतं मिळाली आहेत. दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंह हे ४ वर्षांहून अधिक काळ पंजाबचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर काँग्रेसने त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता. नंतर कॅप्टन अमरिंदर यांनी स्वतःचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस स्थापन केला आणि भाजपशी युती केली. कॅप्टन यांनी दावा केला होता की, आपण अनेक जागांवर निवडणूक जिंकू. पण प्रत्यक्षात मात्र मोठ्या फरकानं पराभूत झाले आहेत.
काँग्रेसच्या हातून पंजाब का गेलं?
काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झाले.