कोलकाता (वृत्तसंस्था) भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी फेसबुकवरून ही घोषणा केली आहे.
यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहेत. सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात राहण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ”गुडबाय…. मी कोणत्याही राजकीय पक्षात जात नाहीये, टीएमसी, काँग्रेस, सीपीआय(एम) कोणीही मला बोलावलेलं नाही, मी कुठेही जाणार नाही. समजाकार्य करण्यासाठी राजकारणातच असण्याच गरज नाही.” असं सुप्रियो यांनी म्हटलं आहे.
बाबुल सुप्रियोंनी म्हटलं आहे की, ”मी नेहमीच एका संघाचा खेळाडू राहिलेलो आहे. नेहमीच एका संघाला पाठिंबा दिला आहे – मोहनबागाना, एकाच पक्षाच समर्थन केलं आहे – भाजपा. तसेच, त्यांनी हे देखील सांगितले की, खूप अगोदर मी पार्टी सोडू इच्छित होतो. निवडणुकी अगोदर पक्षाबरोबर माझे काही मतभेद होते, त्या गोष्टी निवडणुकीच्या अगोदरच सर्वांसमोर आलेल्या आहेत. तर जबाबदारी घेतोच आहे, परंतु दुसरे नेते देखील जबाबदार आहेत.”
राजकारण कधीच सोडायचं होतं
मला केव्हाच पक्ष सोडायचा होता. बऱ्याच दिवसांपासून मनात हे घोळत होतं. आता राजकारणात राहायचं नाही, असं मनानं ठरवलं होतं. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामुळे मी प्रत्येकवेळी निर्णय मागे घेतला. आता तर काही नेत्यांशी झालेले वाद उघड झाले आहेत. त्यामुळे अशा वेळी राजकारणात राहणं योग्य नसल्याचं वाटलं. त्यामुळेच राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.