जळगाव (प्रतिनिधी) शासकीय दालनात वेतनश्रेणीनुसार जिल्ह्यातील एकही अधिकारी दालनात ‘एसी’ बसविण्यासाठी पात्र नाही. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांच्या दालनातील ‘एसी’ काढण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांसहीत अनेकांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आता जळगाव जिल्हा शल्य चिकित्सकांसह एकूण तीन वैद्यकीय अधिका-यांच्या दालनातील एसी काढून घेण्यात आली आहेत. श्री. गुप्ता यांना याबाबतचे पत्र नुकतेच मिळाले आहे.
पत्रकार परिषदेत गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत घेत अधिकाऱ्यांच्या दालनातील ‘एसी’ काढण्याची मागणी केली होती. ‘एअर कंडीशनर’ वापरासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वेतनश्रेणीनुसार परवानगी दिली आहे. त्या वेतनश्रेणीनुसार जिल्ह्यातील एकही अधिकारी दालनात ‘एसी’ बसविण्यासाठी पात्र नाही. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांच्या दालनातील ‘एसी’ काढले गेले पाहिजेत, अशी गुप्ता यांची मागणी होती. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातील एअर कंडीशनर यंत्रे काढण्यात आली आहेत. यात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. किरण पाटील, प्रशासन अधिकारी कक्षातील डॉ. मिलींद बारी आणि निवसी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.पी. सुपे यांच्या दालनाचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात एकुण दोन आणि इतर दोघांच्या दालनात प्रत्येकी एक एसी लावण्यात आला होता. ते चार एसी काढण्यात आले आहे. सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. इतर सर्वच शासकीय कार्यालयातील एसी काढण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे.