पुणे (वृत्तसंस्था) प्रसिद्ध चितळे दुधामध्ये काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत एफडीएकडे तक्रार न करण्यासाठी २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या चार जणांमध्ये एका शिक्षक महिलेचाही समावेश आहे. महिला पुण्यातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. दुकान बंद करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांनी ही खंडणी मागितली होती.
क्राइम ब्रांचने ही कारवाई केली असून करण परदेशी, सुनील परदेशी, अक्षय कार्तिक, पूनम परदेशी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. याशिवाय इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पूनम एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका असून त्यांनी चितळे बंधूंना ईमेल तसंच फोन करुन दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडला असल्याची तक्रार करत पाच लाखांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी बदनामी करण्याची तसंच पैसे दिले नाहीत तर दुकान बंद करायला लावू अशी धमकीही दिली होती. त्यांनी सुरुवातीला केलेली पाच लाखांची मागणी नंतर २० लाखांपर्यंत पोहोचली होती.
चितळेंनी तक्रार केल्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आल्या आणि बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी आरोपींना देण्यासाठी चितळेंना २ लाख दिले होते ज्यामध्ये चलनात नसलेल्या २ हजारांच्या रुपयांच्या नोटा होत्या. आरोपींनी पैसे घेतले तेव्हा पोलीस लांब उभं राहून सर्व पाहत होते. यानंतर त्यांना आरोपींना अटक केली आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. आरोपींचा एक साथीदार कार्तिक याला मुंबईतून अटक करण्यात आली.