कोलकत्ता (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ममतांनी बोलावलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला चार कॅबिनेट मंत्र्यांनी दांडी मारली. त्यामुळे तृणमूलला मोठं भगदाड पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजपा अशी लढत होणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.
त्यानंतर तृणमूल काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा खड्डा पडणार असल्याच्या चर्चा बंगालमध्ये रंगली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे चार कॅबिनेट मंत्र्यांनी पाठ फिरवल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. राजीब बॅनर्जी, रवींद्रनाथ घोष, गौतम देव आणि चंद्रनाथ सिन्हा अशी बैठकीला दांडी मारणाऱ्या चार कॅबिनेट मंत्र्यांची नावं आहेत. मंत्र्यांच्या अनुपस्थितीनंतर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांच्याकडे अनुपस्थितीच्या कारणाची विचारणा करण्यात आली. तीन मंत्र्यांनी कारणं दिली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वनमंत्री राजीब बॅनर्जी यांनी मौन बाळगलं आहे. मात्र, आधीच तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वी नाराज असलेले तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी अमित शाह यांच्या उपस्थित कमळ हाती घेतलं. यावेळी तृणमूलच्या काही नेत्यांनीही भाजपाचा हात धरला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना तृणमूल काँग्रेसला जाहीर आव्हान दिलं होतं. अमित शाह यांनी भाजपा २०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा केलेला आहे.